अलीगड – उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. एका दाम्पत्याने 10 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ट्विंकल असं या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये टप्पल परिसरात एक दाम्पत्य राहते.त्यांची अडीच वर्षाची मुलगी ट्विंकल ही चार दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर गावाबाहेरीलकचराकुंडीजवळ तिचा मृतदेह सापडला होता.
हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच मृतदेह कचराकुंडीत फेकल्याने भटके कुत्रे तिच्या मृतदेहाजवळ असलेले काही ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. मुलीच्या मृतदेह सापडल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.