Skip to content Skip to footer

भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहलं जीवन संपवण्याचं धक्कादायक कारण

चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येची घटना घडली होती. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्येचा प्रकार समोर आला तर आता एका भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कर्त्याने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पंकज संकपाळे असं आत्महत्या केलेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. पंकज हा भाजपचा कार्यकर्ता असून तो माहिती व अधिकारामध्ये काम करायचा. याच कामाअंतर्गत त्याच्यावर काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे तो खूप त्रस्त होता. त्याची न्यायलयीन लढाईदेखील सुरू होती अशी माहिती देण्यात आली आहे. पण उस्मानपुरा पोलीस स्थानकातील पोलीस त्याला त्रास देत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून पंकज याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहली होती. यामध्ये पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्याने लिहिलं होतं. तर तीन पोलिसांचीही नावं या सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आली आहेत. उस्मानपुरा पोलीस स्थानकातील पीएसआय चंदन शेळके यांच्यासह इतर 2 पोलिसांनी यामध्ये नावं लिहिण्यात आली आहे.

पंकजने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते व माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथे अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करत खून केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथील बोरगाव रस्त्यावर बोलत थांबले असता अचानक काही अज्ञातांनी येऊन पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. पाटील यांना गंभीर जखमी करत हल्लेखोर पसार झाले. यानंतर तिथे असणाऱ्या ग्रामस्थांनी पाटील यांना तातडीने मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, घाव वर्मी बसल्याने पाटील यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Leave a comment

0.0/5