Skip to content Skip to footer

यंदाचे नवीन वर्ष घरातूनच साजरे करा, ३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारकडून नव्या गाईडलाइन जारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महापालिका क्षेत्रांत येत्या ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाच आता ३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारकडून गर्दी टाळण्यासाठी नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या अनुषंगाने यात नागरिकांना अनेक सूचना करण्यात आल्या असून ३१ डिसेंबर रोजी दिवसा संचारबंदी नसेल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य सण व उत्सवांप्रमाणे नववर्षाचे स्वागतही यंदा साधेपणाने केले जावे. कुठेही गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला जाऊ नये, यासाठीच या विशेष गाइडलाइन्स असणार आहेत.

काय आहेत राज्य सरकारच्या गाईडलाइन वाचा
१) नागरिकांनी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे.

२) ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

३) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने करोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

४) करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

५)नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

६)नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

Leave a comment

0.0/5