Skip to content Skip to footer

पोलीसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू – अनिल देशमुख

पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्यातील पोलीसदलाचे सक्षमीकरणा करताना करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करतानाच पोलीसांच्या वैयक्तिक आशा-आकांक्षा आणि समस्यांची माहिती घेण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांची बैठक घेतली.

संपूर्ण आयुष्य राज्यातील विविध शहरांत सेवा केलेल्या आणि पोलीस दलाची अगदी तळापासून माहिती आणि अभ्यास असणाऱ्यांना अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते, असे गृह मंत्र्यांनी सांगितले. या वेळी अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या विविध समस्या सांगितल्या. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा केली. प्रकृती अस्वास्थ किंवा बाहेरगावी असलेल्या अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी लिखित स्वरुपात सूचना पाठविल्या होत्या.

माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांनी सुचविले की, पोलीसांच्या शर्ट आणि पॅँटसाठी एकच कापड वापरले जाते. तेभारतीय वातावरणाशी सुसंगत नसल्याने बदलण्याची गरज आहे. शर्टच्या खिशात मोबाईल, डायरीही बसत नाही. त्यामुळे युनिफॉर्ममध्ये हाफ जॅकेटचा समावेश करावा. त्याच्या पाठीमागच्या बाजुला युनिटचे नाव लिहावे. पोलीसांना लेदर बुटामुळे आरोपीचा पाठलाग करणे अवघड होते. त्यामुळे काळ्या रंगाचे स्पार्टस बुट द्यावेत असे त्यांनी सुचविले.

Leave a comment

0.0/5