महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. २३ जानेवारीला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयासमोर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी पेडणेकर यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती.

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला होता.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here