एल्गार परिषदेत हिंदुच्या भावना दुखावल्या प्रकरणी शारजील उस्मानीवर सर्व स्तरातून टीका होत होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी उस्मानीवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. यावर आता आजच्या सामना अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावण्यात आला आहे.
फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ९० दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. असा सवाल फडणवीसांना सामनातून विचारला आहे.
रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळ्यांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय? या शेतकऱ्यांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. भाजप पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल असेही सामनातून सल्ला भाजपाच्या नेत्यांना देण्यात आला आहे.