Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका…

महाराष्ट्र बुलेटिन : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार व्यक्त करणाऱ्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत भाजपा आणि मोदी सरकारला धारेवर धरले. या दरम्यान त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत विरोधी पक्षाची कोंडी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर चर्चा करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय…?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून दिला जात नसल्याची खंत व्यक्त केली. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला होता. मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राला सर्व गोष्टींची पूर्तता करूनही केंद्र सरकारकडून हा दर्जा दिला जात नाही. केंद्राकडून माझ्या मातृभूमीला तिष्ठत उभं ठेवलं गेलं आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का? छत्रपतींची भाषा ही भिकारी असू शकत नाही, ही छत्रपतींची भाषा आहे.” असे म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बाकं वाजवून समर्थन केलं.

गरिबांनीही आत्मनिर्भर व्हावे यासाठी इंधन दरवाढ?

मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडत म्हटले की प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत आठ महिन्यांसाठी ८० कोटी गरीब लोकांना ५ किलो धान्य मोफत दिले गेले. मात्र आठ महिन्यांनतर ही गरीब जनता अचानक श्रीमंत झाली का? पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ झाली तरी चालेल मात्र गरिबांनी गरीब राहता कामा नये, आत्मनिर्भर झालं पाहिजे, म्हणून आत्मनिर्भर होण्यासाठी इंधनवाढ केली का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणत कोरोना आला…

कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय आहे, पण मला गोर-गरिबांची चूल विझवायची नाही. राज्यातील जनतेची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मला जर कुणी व्हिलन ठरवत असेल तरी त्याची मला पर्वा नाही. विशेष म्हणजे व्हायरस कोणालाही ओळखत नाही, आता तो ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणत परत येण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी सभागृहात हशा पिकला होता. या व्हायरसला थांबवण्यासाठी मास्क, हात स्वच्ह धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा आपण अवलंब करूया असे त्यांनी सांगितले.

सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघतोय की काय, असा भास झाला!

मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बघत म्हटलं की, सुधीरभाऊ मी माझ्या केबिनमध्ये कामकाज करत असताना तुमचं भाषण ऐकत होतो, तेव्हा मला भास झाला की, मी नटसम्राट बघतोय की काय, मी अथेल्लो, मी अमुक.. तमुक.. पण त्याचा शेवट हा फार केविलवाणा वाटला. कारण शेवटी ते म्हणत होते कुणी किंमत देतं का किंमत..? काय तुमचा आवेश… ते पाहून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटायला लागली की, आमचे कसे होणार? कारण तुम्ही ज्या तडफेने बोलता ते अप्रतिम होतं! तुमच्यातला कलाकार हा लपून राहत नाही, तुमच्या कलागुणांना इथे वाव मिळत नाही, असे मला वाटते. यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. अशा रीतीने मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार टोला आपल्या भाषणातून लगावला.

५ रुपयांत शिवभोजनाची भरलेली थाळी आम्ही देतोय, रिकामी थाळी वाजवत नाही…

तसेच शिवभोजन थाळीविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही ५ रुपयांत शिवभोजनाची भरलेली थाळी देतो, गरीब जनतेला पोट भरून जेवण देतो, नुसतीच रिकामी थाळी वाजवत नाही. भरलेली थाळी आणि रिकामी थाळी हा या सरकारमधील फरक आहे, असे म्हणत मोदी सरकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिमटा काढला.

सावरकरांना भारतरत्न का देण्यात येत नाही?

तसेच त्यांनी म्हटले की ‘सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे सावरकर’, या विषयावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्याकडून सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा याबाबत दोन वेळा केंद्र सरकारला पत्र देण्यात आले आहे. मात्र त्यावर अंमलबाजावणी केली जात नाही. तसेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, कोण देतं हो भारतरत्न? आपली काही आमदारांची कमिटी ठरवते का, कोणाला भारतरत्न द्यावा? भारतरत्न देण्याचा अधिकार हा पंतप्रधानांना आणि केंद्रीय समितीला असतो. मग का नाही दिला जात सावरकरांना भारतरत्न? फक्त हे आमचे, ते आमचे म्हणून हिंदुत्व सिद्ध होत नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.

तसेच मेट्रो कारशेडबाबत एकत्र बसून मार्ग काढू असेही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यपालांच्या भाषणावर पुन्हा येत त्यांनी राज्यपालांनी जो सीमाप्रश्नाचा मुद्दा मांडला होता, त्यास धन्यवाद दिले. त्यांनी स्पष्ट केले की राजकीय अभिनिवेश जोड वगैरे असतातच, पण काही गोष्टी अशा असतात की जोडे, अभिनिवेश बाजूला सारून राज्यासाठी एकत्र यावे लागत असते. यासाठी सोबत येण्याचे मान्य केले म्हणून देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी धन्यवाद म्हटले. यामुळे कर्नाटक सरकारची जी मराठी बांधवांवर कानडीची सक्ती लादली जात आहे, ती मोडून काढण्यास चालना मिळेल असे मुख्यमंत्रांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक गोष्टींवर भाष्य केले. तसेच त्यांनी ‘ए महाराष्ट्र के लोगों, पोछ लो आँख का पानी, जो झूँठ बोलते है, उनकी ख़तम करो बेईमानी’ असा टोला देखील त्यांनी भाजपाला लगावला. तसेच कोरोनाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की विरोधकांकडून कोरोनाच्या बाबतीत आमच्यावर निशाणा साधला जातो. परंतु महाराष्ट्रातील खरी आकडेवारी आम्ही सांगतो, आम्ही आकडेवारी लपविली नाही. खोटेपणा करणे आमच्या रक्तात नाही. ‘पाट थोपटून घेण्यासाठी आधी काम करणारी छाती लागते’ अशा शब्दांत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. तसेच त्यांनी मोदी सरकारला प्रश्न केला की, “पीएम केयर योजनेचा हिशोब कोण देणार? तुमचा फंड हा चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. जर कोणी प्रश्न विचारला तर तो देशद्रोही, ही इथली लोकशाही…!” अशा शब्दांत त्यांनी भाजपाला जाब देखील विचारला. शेवटाला त्यांनी राजकारण, आरोप-प्रत्यारोप, द्वेष बाजूला सारून महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांच्या भाषणातून केले.

Leave a comment

0.0/5