Skip to content Skip to footer

‘शिवसेना’ ममता दीदींच्या पाठीशी, संजय राऊतांनी ट्विटद्वारे दिली माहिती

महाराष्ट्र बुलेटिन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या बंगालमधील राजकीय वातावरण जोर धरू लागले आहे. बंगालमध्ये थेट लढत ही तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. दरम्यान तृणमूलच्या बऱ्याच नेत्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतल्यानं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर यावेळी मोठं आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेना तृणमूल काँग्रेसच्या मदतीला धावून गेली आहे, त्यामुळे भाजपाने आमदाराने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेनं बिहारमध्ये देखील काही जागांवर आपलं भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्येही शिवसेना आपली ताकद आजमावणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक ट्विट देखील केले होते. ते म्हणाले होते की, ‘अनेकांना प्रश्न पडला आहे की, शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर त्याबाबत अपडेट मी तुम्हाला देत आहे.’

‘सध्या बंगालमध्ये दीदी विरुद्ध सगळे अशी परिस्थिती निर्मिती झाली आहे. सर्व एम म्हणजेच मनी, मीडिया आणि मसल हे एकट्या ममता बॅनर्जींविरोधात वापरले जात आहेत. या कारणामुळे निवडणुकीच्या रिंगणात न उतरता त्यांच्यामागे ठाम उभे राहण्याचे आम्ही ठरवले आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत’, असे संजय राऊतांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले.

Leave a comment

0.0/5