Skip to content Skip to footer

बर्थडे स्पेशल: फॅण्ड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट, नागराज मंजुळे चा प्रवास

मुंबई: सिनेसृष्टीची प्रस्थापित चौकट उखडून, लेखणी आणि दिग्दर्शनाच्या जोरावर स्वत:चं आयाम सिद्ध करणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे चा आज वाढदिवस. 24 ऑगस्ट 1977 रोजी जन्मलेला नागराज वयाची 41 वर्षे पूर्ण करतोय.

नागराज हे नाव ऐकायला आलं की लगेचच जोडलं जातं ते फँड्री आणि सैराट. मराठी सिनेसृष्टीला शंभर कोटी कमाईचं स्वप्न नागराजने दाखवलं. सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचलाच, पण त्याने बॉलिवूडलाही मोहात पाडलं. बॉलिवूडचा ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा हिंदी रिमेक धडक बनवला.

इतकंच नाही तर खुद्द बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनीही नागराजसोबत काम करण्याची तयारी दर्शवली.

सोलापुरातील एका छोट्याशा गावातून येऊन आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौशल्याद्वारे नागराजने मायानगरीत एक वेगळे अस्तित्व निर्माण केलं. या यशस्वी दिग्दर्शकाला एबीपी माझाने 2016 चा ‘माझा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवलं.

माझ्या हाती नसती लेखणी, तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसत राहिलो असतो. हा अतोनात कोलाहल मनातला. मनातला हा कोलाहल मांडायला त्याला सिनेमाचं माध्यम मिळालं आणि त्याने जगलेलं वास्तव रुपेरी पडद्यावर अनुभवताना सारा समाज अंतर्मुख झाला. यशा-अपयशाची पर्वा न करता आपल्या कलाकृतीशी प्रामाणिक राहणारा हा मनस्वी दिग्दर्शक, निर्माता अन् अभिनेता नागराज मंजुळे कवितेतून व्यक्त होत होता.

त्याला कॅमेऱ्याची भाषा उमगली आणि मग त्याच्यातला हळवा तरीही विद्रोही कवी कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायला लागला. वास्तवाला थेट भिडणारा, रूळलेल्या समीकरणांना शह देणारा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरत कलात्मकता अन् व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य गाठणारा दिग्दर्शक. त्याच्या सैराटने लोकप्रियतेची व्याख्याच बदलवून टाकली.

मराठी सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये येऊ शकतो, हे स्वप्न त्याने दाखवलं. त्याचं हे मांडणं… बोलणं रसिकांना पिस्तुल्यात भावलं. फॅण्ड्रीत काळजाला भिडलं आणि सैराटने तर झिंगाट करुन सोडलं. समाजातील अश्वत्थाम्याच्या जखमा त्याने नेमक्या जोखल्या अन् समाजातील विसंगतीवर आपल्या माध्यमातून भाष्य केलं. केवळ मराठीच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांना झिंगाट करुन सोडणाऱ्या या सैराट दिग्दर्शकास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5