Skip to content Skip to footer

अमेरिकेचा पाकिस्तानला झटका, व्हीसाची मर्यादा 5 वर्षांवरून तीन महिने केली

अमेरिकेने पाकिस्तानला तगडा झटका दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मिळणाऱ्या व्हीसाच्या मर्यादेमध्ये मोठी घट करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांना मिळणाऱ्या व्हीसाची मर्यादा पाच वर्षावरून फक्त तीन महिन्यांवर आणल्याची माहिती अमेरिकेच्या उच्चायुक्तांलयाच्या प्रवक्यांनी दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने जागतिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो हे जागतिक स्तरावर स्पष्ट झाल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांना आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी व्हीसा देण्यात येणार नाही हे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. याआधी पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेकडून पाच वर्षांसाठी व्हीसा दिला जात होता.

याआधी हिंदुस्थानच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने अमेरिकन बनावटीच्या एफ-16 चा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला झापले होते. तसेच पाकिस्तानमध्ये पाळला गेलेल्या दहशतवादावरही अमेरिकेने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. तसेच हिंदुस्थानला कारवाईसाठी देखील अमेरिकेने पाठिंबा दिला होता, हिंदुस्थानने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकचे देखील समर्थन केले होते.

16 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने जम्मू-कश्मीरच्या पुलवाला जिल्ह्यात अवंतीपुरा येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते. यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचा ‘मोस्‍ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला. तसेच 26 फेब्रुवारीला वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोट येथे घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवत केले होते. हिंदुस्थानच्या या कारवाईला जगभरातून समर्थन मिळाले होते.

Leave a comment

0.0/5