Skip to content Skip to footer

बुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर

बुलेट ट्रेन प्रकल्पास जागा देण्यास शेतक ऱ्यांकडून काही भागात विरोधाचा सामना करावा लागत आहे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी शीळ भागातील महापालिकेची जागा देऊन त्याचा आर्थिक स्वरूपात मोबदला घेण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही समर्थन दिले. या स्थगितीमुळे प्रकल्पासाठी जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई-अहमदबाद बुलेट ट्रेन प्रकल्पास जागा देण्यास शेतक ऱ्यांकडून काही भागात विरोधाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींचा मोबादला दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील शीळ, डावले, पडले, माथार्डी, देसाई, आगासन आणि बेतावडे या गावांमधील प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनींसाठी प्रति हेक्टर ९ कोटी रुपये मोबदला दर निश्चित करण्यात आला आहे. शिळ भागात ३८४९ चौरस मीटर क्षेत्रफळ जागा महापालिकेच्या मालकीची आहे.

ही जागा भूखंड विकास आराखडय़ात रस्त्याचा भाग आहे. या जागेतून बुलेट ट्रेन जाणार असल्यामुळे एनएचएसआरसीएल जागा देण्याची मागणी केली असून त्यासाठी ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला देण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार मोबदला घेऊन शीळ येथील प्रकल्पात बाधित होणारी जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. प्रस्ताव सभेचे विषयपत्रिकेवर सर्वात शेवटी होता.तो चर्चेला येताच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या  मत मांडण्यास सुरुवात केली. परंतु हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट करताच राष्ट्रवादीने त्यास समर्थन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे भाजप प्रस्ताव मंजुरीचा आग्रह धरेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र भाजपच्या नगरसेवकांनी मौन बाळगल्याचे दिसून आले.

Leave a comment

0.0/5