Skip to content Skip to footer

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना १५,५०० रुपये सानुग्रह अनुदान

या निर्णयामुळे पालिका तिजोरीवर एकूण १६ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

करोना विषाणू प्रादुर्भावानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळते की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असतानाच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी घेतला आहे. या निर्णयामुळे पालिका तिजोरीवर एकूण १६ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना विषाणचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात अधिकारी कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे पालिकेला करवसुली करणे शक्य झाले नव्हते. त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर होऊन पालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. जून महिन्यापासून पालिकेने करवसुलीवर लक्ष दिले असले तरी पालिकेचा करोना नियंत्रण कामावरही मोठा खर्च होत आहे.

त्यामुळे यंदा पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळते की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनामध्ये बुधवारी एक बैठक पार पडली. त्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेत्या प्रमिला किणे,  राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, म्युनिसिपल युनियनचे नेते रवि राव, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख हे उपस्थित होते.

१६ कोटी रुपयांचा भार

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा १५ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील ७ हजार ९१ अधिकारी-कर्मचारी तसेच मानधनावरील २६२ कर्मचारी, शिक्षण विभागाकडील एकूण १ हजार ४७ कर्मचारी आणि परिवहन सेवेमधील १ हजार ८५० कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे पालिका तिजोरीवर एकूण १६ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. हे सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  करोनाच्या संकटात केलेल्या कामाची दखल घेत या वेळी मागील वर्षीपेक्षा वाढीव एक हजार रुपये देऊन १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे महापौर विनिता राणे यांनी सांगितले.

महापालिकेतील, परिवहन विभागातील कायम, अस्थायी, कंत्राटी अशा एकूण सहा हजार ३७६ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात आला होता. या वेळी करोना संकटामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. शासनाकडून येणारा निधी वेळेवर मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा दिवाळी बोनस मिळतो की नाही अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये  होती. सोमवारी आयुक्त डॉ. सूर्यवंशी, महापौर राणे, सभापती विकास म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्षनेते राहुल दामले, गटनेते शैलेश धात्रक, गटनेते मंदार हळबे यांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना महामारीच्या मागील सात महिन्यांच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम केले आहे. त्या कामाचे कौतुक आणि दिवाळी सण प्रत्येकाला आनंदाने साजरा करता यावा या विचारातून हे सानुग्रह अनुदान देण्यात आले. दिवाळीपूर्वी ते कर्मचाऱ्यांना मिळेल, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे महापौर राणे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5