उर्मिला मार्तोडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी,
ठाकरे सरकारकडून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासाठी १२ उमेदवारांची यादी तीन पक्षांच्या मंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. या यादीत शिवसेनेकडून सिनेअभिनेत्री तथा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसनेही ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली असा दावा केला होता. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचे नेमकं कारण सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उर्मिला मातोंडकर उमेदवारी देण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, “उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारी अभिनेत्री सभागृहात गेल्यास महाराष्ट्राला फायदाच होईल” असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलून दाखविले होते.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. परिवहनमंत्री अनिल परब, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या तीन पक्षांच्या मंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे १२ नावांची यादी सादर केली.