सीबीआयच्या तपासात कोणतेही नवीन मुद्दे न आल्याने आणि तपासासाठी यापूर्वी पोलीस पुरेशी कोठडी दिली आहे, असे नमूद करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींची न्यायालयीने बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हा आदेश विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी दिला. आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे.या प्रकरणातील आरोपीपींची सीबीआय कोठडी संपत असल्याने दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपी हे मोठ्या कटात सहभागी होते. पुनाळेकर यांनी यापूर्वी अटक आरोपींना पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला आहे. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे. त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. तसेच पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटाचे अद्याप विश्लेषण झालेले नाही. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी आहे. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची अतिरिक्त सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील सूर्यवंशी यांनी केली.
आतापर्यंत सादर केलेल्या तिन्ही रिमांड रिपोर्टमध्ये कोठडीची कारणे सारखी आहेत. सीबीआयने कोठडीच्या कालावधीत कोणत्याही नवीन मुद्द्यावर तपास केलेला नाही. तसेच कोठडीचे मुद्देदेखील समाधानकारक नाहीत. प्रत्येक आरोपीच्या वेळी दुचाकी जप्त करण्याचे कारण सीबीआय देत आहे. मात्र अद्याप ती दुचाकी जप्त झालेली नाही. पुरेशी कोठडी मिळाली असल्याने आरोपींना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.
दरम्यान सीबीआयने आज एक गुप्त अहवाल न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सात जून रोजी सुनावणी होणार आहे. दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर यान दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने त्यांना २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. कळसकर याच्याच जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. आरोपींना प्रथम १ जूनपर्यंत व नंतर ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही मुदत संपल्याने आज पुनाळेकर व भावे या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने आरोपींच्या कोठडीची मुदत १४ दिवसांनी वाढविण्याची मागणी केली. मात्र, रिमांंडची कारणे तेच असल्याने ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते.