Skip to content Skip to footer

मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे दहा हजार गावे जल संकटात

मॉन्सूनचे आगमन लांबल्याने राज्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार एप्रिल महिन्यातच राज्यातील १० हजार ३६६ गावांतील भूजल पातळी लक्षणीयरित्या खालावली आहे. त्यातील एकवीसशे गावातील भूजल पातळी अत्यंत खालावली आहे. लांबलेल्या पावसाचा या गावांवर अधिक तीव्रतेने परिणाम जाणवेल असे चित्र आहे.

गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात ३ हजार २६७ लहानमोठे धरण प्रलक्लप आहेत. या धरणांची साठवण क्षमता १ हजार ४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. त्या पैकी मंगळवार अखेरीस ९८ टीएमसी (६.८५ टक्के) पाणीधरणांत शिल्लक आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ८० टक्के लोकसंख्या सिंचन आणि पाण्यासाठी भूजलावर अवलंबून आहे. सातत्याने होत असलेला उपसा आणि सलग दोन वर्षे पर्जन्यमानात झालेली घट यामुळे यंदा बहुतांश भागातील भूजल पातळी खालावली आहे.

भूजल विभागाने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील १० हजार ३६६ गावांतील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यातील ५ हजार ६४० गावांमधे भूजल पातळी सरासरीपेक्षा १ ते २ मीटरने खालावली आहे. तर २ हजार ५५६ गावांतील पाणी पातळीत २ ते तीन आणि २ हजार १७० गावांत तब्बल ३ मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेली आहे. राज्यात दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसलेल्या मराठवाड्यातील तब्बल ४ हजार ६८१ गावांतील पाणीपातळी खाली गेली आहे. त्यातील १३८० गावांमधे सरासरीपेक्षी तीन मीटरहून अधिक पाणी खोल गेले आहे. तर, २ हजार ७१ गावांतील पाणी पातळीत १ ते २ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.
केरळात पावसाचे आगमन लांबल्याने राज्यात सर्वत्र पाऊस व्यापण्यास आणखी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आधीच पाणी खोल गेलेल्या गावांत टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाणी पातळी खोल गेलेल्या गावांची संख्या 

जिल्हा        ३ मीटरपेक्षा अधिक        २-३ मीटर    १-२ मीटर
जळगाव        १८२            १६२        ३०२
अहमदनगर        ९५            १५६        २६०
पुणे            ४३            १२४        १९२
सोलापूर        ९२            १८२        ३०९
औरंगाबाद        १९४            ३१०        ४७१
बीड            ३१६            २३५        ३९२
जालना        २१६            २०८        ३०४
उस्मानाबाद        २९०            १४४        ११२
लातूर            १९९            ११९        २३४
अमरावती        ६७            १८५        ४६७
बुलडाणा        २०            ३८        ५११
वर्धा            १            ६४        ३५९

Leave a comment

0.0/5