Skip to content Skip to footer

मुंबई-पुण्यात लॉकडाउनचा कालावधी १८ मे पर्यंत वाढू शकतो – राजेश टोपे

सध्या देशात सुरु असलेला लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मुंबई, पुण्यामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात १८ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लाइव्ह मिंटशी बोलताना ही माहिती दिली.

“करोना व्हायरसचा फैलाव रोखणे हा लॉकडाउन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण त्यांचा फैलाव कमी होत नसेल तर आम्हाला लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल” असे टोपे फोनवरुन लाइव्ह मिंटशी बोलताना म्हणाले.

“सध्याच्या घडीला फक्त झोपडपट्टयांमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद राहतील हे सुनिश्चित केले पाहिजे. गरज पडली तर तीन मे नंतर मुंबई, पुण्यातील फक्त कंटेन्मेंट झोनमध्ये आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवू शकतो” असे राजेश टोपे म्हणाले.

सध्या राज्यात ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या सात एप्रिलपासून कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. मुंबई आणि पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाउन कायम राहू शकतो.

२४ एप्रिलला महाराष्ट्रात ३९४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, राज्यात सध्या करोनाचे ६८१७ रुग्ण आहेत. एकटया मुंबईमध्ये ४,४४७ रुग्ण आहेत. पुण्यात १०२० करोना रुग्ण आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचे २२० रुग्ण आहेत.

Leave a comment

0.0/5