हवामान विभागाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, उद्या मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबई, ठाण्याबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी आज (२१ सप्टेंबर) व उद्याच्या (२२ सप्टेंबर) हवामानाविषयीचं ट्विट केलं आहे. होसळीकर यांनी आज व उद्या पडणाऱ्या पावसाविषयी माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आज दक्षिण कोकण व गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्याचबरोबर उद्या (२२ सप्टेंबर) मुंबई व ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम घाट परिसरातील रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पुढील २४ तासांत सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले, तरी सायंकाळनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.