Skip to content Skip to footer

गृहमंत्री देशमुख पुणे पोलिसांसोबत करणार नववर्षाचं स्वागत

खास संदेश लिहिलेला केकही कापणार…

जगावर असणारं करोनाचं संकट टळण्याकडे लक्ष लागलं असतानाच नव्या करोना अवताराचं सावट गडद होऊ लागलं आहे. भारतात मंगळवारी करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले काही रुग्ण आढळले. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. ‘थर्टीफर्स्ट’च्या आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्यांना राज्याच्या गृहमंत्रालयाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ११नंतर पब्स, बार वगैरे बंद असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीसांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख हे आज रात्री १२ वाजता पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. आगामी वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी ‘होप 2021’ असे लिहिलेला केकही पोलीस कर्मचारी वर्गासोबत कापला जाणार आहे.

नववर्षाच्या पार्ट्या करणाऱ्या उत्साहींना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. “करोनाचे संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने करा. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ वाजल्यानंतर हे सर्व बंद होणार आहे. याचाच अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने असणार आहेत. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे”, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यतील जनतेला दिल्या आहेत.

मोठ्या शहरातील (मेट्रो सिटी) आणि हिल स्टेशन असलेल्या शहरांमध्ये किंवा ठिकाणांच्या बाबतीतही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना संबंधित जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिल्या असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5