प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच अण्णांना खरी आदरांजली- अजित पवार
राज्यात शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अभिवादन केले. आज राज्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देणे, विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सत्यशोधक विचारांची, सामाजिक मूल्यांची शिकवण रुजवणं, प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच अण्णांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या गावखेड्यात नेली. जाती, धर्म, पंथ, वर्गाच्या भिंती तोडून शिक्षणाची दारं सर्वांना खुली करुन दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी, दारिद्र्यासारख्या समस्यांवर ‘शिक्षण’ हाच एकमेव आणि प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी ओळखलं होतं. त्यासाठी त्यांनी राज्यात शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे सुरु केली. गरीबांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलं. त्यांचं शिक्षण अखंड सुरु रहावं यासाठी ‘कमवा आणि शिका’ सारखी योजना सुरु केली.