मद्य विक्रीत मोठी वाढ

मद्य-विक्रीत-मोठी-वाढ-Alcohol-sales-big-growth

राज्याच्या महसुलात १२३९ कोटींची भर

एका बाजूला करोना कहर, टाळेबंदीमुळे सारे ठप्प अशा स्थितीमध्ये ऑनलाइन मद्यविक्री आणि आता बार उघडण्याला परवानगी दिल्यानंतर औरंगाबाद शहरातील १२ मद्य उत्पादक कंपन्यांनी एप्रिल ते ऑक्टोबर या कालवधीमध्ये १२३९ कोटी रुपये ६१ लाख सात हजार एवढा कर राज्य सरकारच्या तिजोरीत भरला आहे.
सर्वाधिक कर भरणाऱ्या कंपनीमध्ये युनायटेड स्पिरिट या विदेशी मद्य निर्मितीने कंपनीने ३२७ कोटी २९ लाख रुपयांहून अधिक कर भरला असून रॅडिको एन. व्ही या कंपनीने २८५ कोटी १२ लाख रुपयांहून अधिक कर भरला आहे. मद्यनिर्मिती आणि विक्री दोन्हीमध्ये वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यात देशी-विदेशी मद्याबरोबरच वाइन विक्रीमध्ये मोठी वाढ असून ती गेल्या दोन महिन्यांत ३९ टक्के जास्त असल्याची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागात आहे.
औरंगाबाद शहरात १२ देशी-विदेशी मद्य व बिअर उत्पादक कंपन्या आहेत. सहा बिअर उत्पादक कंपन्यांपैकी युनायटेड ब्रव्हेरिज मिलिनियम मधून १५२ कोटी २५ लाख ४४ हजारांहून अधिकचा कर दिला असून ‘कार्ल्सबर्ग’ या बिअर कंपनीकडून ११३ कोटी ७७ लाखांहून अधिक कर राज्य सरकारला मिळाला. देशी आणि विदेशी मद्य विक्रीसाठी ऑनलाइन परवानगी दिल्यानंतर राज्यभर मद्यविक्री दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. नैराश्यामुळे मद्यसेवनात वाढ झाल्याचेही मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र अद्यापि कोविड पूर्व मद्यविक्री होत नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील आधिकारी सांगत आहेत. बार सुरु होईपर्यंत मद्यविक्रीमध्ये अडचणी होत्याच. घरी मद्यसेवन करणे मध्यमवर्गीयांना अडचणीचे असल्याने बार सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. आता बारमधील गर्दी वाढू लागली आहे. तसेच विक्रीचा आलेखही प्रतिमाह वधारतोच आहे.
मिलिनियम, काल्सबर्ग सारखे लोकप्रिय बॅन्डसह विदेशी मद्याच्या महत्त्वाच्या कंपन्या औरंगाबाद येथे असल्याने राज्याच्या महसुलामध्ये मोठी वाढ दिसत आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत देशी, विदेशी मद्याबरोबरच वाइन विक्रीतील वाढ लक्षणीय मानली जात आहे. आरोग्यवर्धकता हेही त्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

* गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ११ लाख ४० हजार ३४६ लिटर देशी दारू विक्री झाली होती. त्यात सप्टेंबर २०२० मध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली. १२ लाख ३८ हजारांहून अधिक देशी दारू विक्री झाली होती.

*  विदेशी मद्य विक्रीमध्ये पाच टक्के वाढ झाली असून बिअरविक्रीमध्ये मात्र नऊ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

*  विशेष म्हणजे या वर्षी वाइन विक्रीमध्ये मोठी वाढ दिसून आली असून ती ३९ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा हजार ७०१ लिटर वाइन विक्री झाली होती ती  या वर्षी नऊ हजार ३०८ एवढी झाली आहे.

*  एप्रिल ते सप्टेंबर या कालावधी ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातील देशी मद्यामध्ये नऊ टक्के तर विदेशी मद्यात सात टक्के विक्रीमध्ये वाढ दिसून आली असून वाइनमध्ये सप्टेंमध्ये १५.५७ आणि ऑगस्टमध्ये ३८.९० टक्के विक्री वाढल्याचे दिसून आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here