Skip to content Skip to footer

तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीच्या दिशेने जाण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखून ताब्यात घेतले होते. यावेळी तृप्ती देसाईंनी उपस्थित असलेल्या माध्यमांशी संवाद साधताना ‘मी शिर्डीकडे जाण्यासाठी ठाम आहे’, असे वक्तव्य केले होते.

यावर बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी मी शिर्डीला चालले आहे. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा शिर्डी संस्थान प्रयत्न करत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवले असून, याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत’, असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून, भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a comment

0.0/5