Skip to content Skip to footer

पेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेच्या जिवाशी असा खेळ कशासाठी करीत आहात? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

महाराष्ट्र बुलेटिन : लोक कोरोना आणि लॉकडाऊनचा सामना करत आहेत, अशातच आता पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. बऱ्याच ठिकाणी पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर या महिनाभरात पाच वेळा गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आता मोदी सरकारला घेरलं आहे. शिवसेनेनं म्हटलं की, “पेट्रोल-डिझेलचे भाव कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येत नसेल तर मार्च-एप्रिलपर्यंत पेट्रोल-डिझेलचे आणि गॅसचे दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडले जात आहेत?” असा प्रश्न शिवसेनेकडून मोदी सरकारला केला जात आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला प्रश्न करत धारेवर धरलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर मार्च-एप्रिलमध्ये कमी होतील असे विधान रविवारी केले होते आणि सोमवारी लगेचच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत तब्बल २५ रुपयांनी वाढली. यावर शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला की जनतेला शाब्दिक दिलासा देखील मिळू न देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे का? मोदी सरकारने सांगितले की, पेट्रोलियम देशांना उत्पादन वाढविण्याचे सांगितले असून जनतेला लवकरच दरवाढीपासून दिलासा मिळेल, दरवाढ रोखण्याची ही कोणती पद्धत आहे? मोदी सरकारने सांगितल्यावर तेल उत्पादक देश लगेचच त्यांचे उत्पादन वाढवतील का? त्यापेक्षा दर कमी करा. दर कमी करण्याऐवजी भलतेच सांगून मोकळे होत आहात. अशा पद्धतीने पेट्रोलियम मंत्र्यांच्या विधानाचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे.

तसेच शिवसेनेनं असेही प्रश्न उपस्थित केले की, घरगुती गॅस सिलिंडरने हजारी गाठावी असा विचार मोदी सरकारचा आहे का? आज एका सिलिंडरला तब्बल ८२० रुपये मोजावे लागत आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार मार्च-एप्रिलपर्यंत दर कमी होतील, परंतु तोपर्यंत ते वाढतच राहतील, त्याचे काय? शिवाय दर कधी कमी होतील याचाही अंदाज देता येत नाही असे सरकार म्हणते. मग मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे का म्हणून हवेत सोडले जात आहेत? असे प्रश्न करत शिवसेनेनं पुढे म्हटलं की, मुळात खरा प्रश्न हा पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरात होत असणाऱ्या अनियंत्रित वाढीचा आहे. या दरवाढीला लगाम घालण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. एप्रिलपर्यंत दर कमी होतील असे सांगितले जात आहे पण तोपर्यंत किमती या प्रचंड वाढलेल्या असतील, का जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहात? असा जाब देखील शिवसेनेनं विचारला.

याव्यतिरिक्त सामनाच्या अग्रलेखातून असाही सवाल करण्यात आला आहे की, “पुढील एक-दोन वर्षात दोन कोटी मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत, असे सरकारने सांगितले आहे. पण मोफत गॅस कनेक्शन दिल्यांनतर ग्राहकाला जर प्रत्येक सिलिंडरसाठी हजाराच्या वर पैसे मोजावे लागत असतील तर कसे होणार? आधी १०० वरून २०० रुपये किंमत करायची आणि नंतर थोडीफार किंमत कमी करून ‘स्वस्ताई’चा आव आणायचा. थोडक्यात काय तर पेट्रोल-डिझेल दरवाढीची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’ करून जनतेकडून ‘कोहळा’ काढायचा आणि नंतर काहीशा दरकपातीचा ‘आवळा’ जनतेच्या हातावर टेकवायचा असा सगळा प्रकार सुरू आहे.” तसेच शिवसेनेनं मोदी सरकारला असा इशारा देखील दिला की, तुम्ही पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कमी करू शकता, ते आधी करा, नाहीतर दरवाढीचा भडका उडेल आणि त्यात कोहळा, आवळा असं सगळंच भस्म होईल, हे लक्षात ठेवा.

Leave a comment

0.0/5