मुंबई – भारतीय बॅंकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून भारतातून पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला अखेर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टानं फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 12(1) मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधिश सलमान आझमी यांनी हा निकाल दिला आहे.
न्यायालयाच्या या निकालानंतर विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्याने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे आणखी काही वेळ मागितला होता, मात्र न्यायालयाने मल्ल्याची ही विनंती फेटाळून लावली.
काय आहे कायदा
नवीन कायद्यांतर्गत ज्यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडींन जप्त केली जाते. तसेच गुन्हा केल्याबाबत त्याच्याविरोधात अटक वाॅरटही जारी केले जाते. त्यास फरार आर्थिक गुन्हेगार ठरवले जाते. या अंतर्गत 100 कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक, कर्जाचा परतावा न करणे यासारखी प्रकरणे येतात.
या कायद्याअंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर केल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.