अमरावती : राज्यातील ब्राह्मण समुदायाला प्रभावित करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बेरोजगार ब्राह्मण युवकांना कारचे वाटप केले असल्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे.
चंद्राबाबू नायडूंनी ही युक्ती आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मण समुदायाला खूश करण्यासाठी लढविली आहे. त्यांनी अमरावती येथे ब्राह्मण समुदायातील गरीब युवकांच्या मेळाव्यात 30 स्विफ्ट कारचे वाटप केले. सरकार अन्य समुदायाप्रमाणे या समाजातील आर्थिकदृष्टया कुमकुवत असलेल्या नागरिकांना मदत करणार असल्याचे चंद्राबाबूंनी म्हटले आहे.
ब्राह्मण सुमदायासाठी अनेक कल्याणकारी योजना आंध्र प्रदेशातील टीडीपी सरकारने सुरु केल्या आहेत. सुमारे दहा हजार ब्राह्मणांना कर्ज आणि अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने वाटलेल्या या 30 कारचा उपयोग वाहतुकीसाठी करता येणार आहे. चंद्राबाबू नायडू म्हणाले, की आंध्र प्रदेश हे असे पहिले राज्य आहे ज्यामध्ये ब्राह्मण आयोग स्थापन करण्यात आला असल्यामुळे गरीब ब्राह्मण कुटुंबाला शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग आणि सांस्कृतिक कार्यकरीता आर्थिक सहाय्यता देण्यात येईल.