Skip to content Skip to footer

देशात तुकडे-तुकडे गँगनंतर लव्ह जिहादही नाही, गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा

देशात लव्ह जिहाद होत असल्याचा आरोप अनेकदा होत असतो. काही राज्यातील न्यायालयात या प्रकरणी खटलेही दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबद केंद्र सरकारकडून देशात एकही लव्ह जिहादचे प्रकरण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मंगळवारी संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं.

गृह मंत्रालयाने म्हटलं की, केरळचे कॉंग्रेस नेते बेन्नी बेहनान यांनी गेल्या दोन वर्षात दक्षिणेकडील कोणत्या राज्यात लव्ह जिहाद झाले आहे का असा प्रश्न विचारला होता. लव्ह जिहाद अशी कोणती संकल्पनाच नसल्याचं केंद्राने सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणा केरळमधील दोन आंतरधर्मीय विवाहाच्या प्रकरणांचा तपास करत असल्याचंही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

लव्ह जिहाद ही संकल्पना हिंदुत्ववादी संघटनांकडून वारंवार पुढे आणली जात आहे. यामध्ये मुस्लिम तरुण हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याशी लग्न करून धर्मांतर करायला लावतात असा आरोप केला जातो. तसेच भारतातील मुस्लिम लोकांची संख्या वाढवणं हा उद्देश यामागे असल्याचंही म्हटलं जातं.

याआधी तुकडे-तुकडे गँगबद्दलही अशीच माहिती समोर आली होती. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तुकडे-तुकडे या टोळीविषयी कोणतीही माहिती नाही असे उथ्तर देण्यात आलं होतं.

‘तुकडे-तुकडे टोळी’ हा शब्द डाव्या-समर्थीत गट आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या नंतर ‘तुकडे-तुकडे गँग’ तयार झाली. त्यावेळी हा कार्यक्रम आयोजित करणार्‍या जेएनयू विद्यार्थी संघटनेचे प्रमुख कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a comment

0.0/5