Skip to content Skip to footer

अमेरिकेत होणाऱ्या बॉलिवूड इव्हेंटच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानी रेहान सिद्दीकीवर बंदी… – शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश.

अमेरिकेत होणाऱ्या बॉलिवूड इव्हेंटच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानी रेहान सिद्दीकीवर बंदी… – शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश.

इव्हेंटमध्ये सामील झालेल्या सेलिब्रिटींची ईडी आणि एनआयएमार्फत चौकशी करण्याची शेवाळे यांची मागणी

अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली आहे. बॉलिवूड इव्हेंटच्या नावाखाली भारता विरोधी कारवाया करणाऱ्या या टोळीच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून आवाज उठणाऱ्या शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवून केंद्रीय गृह मंत्रालयाने या कारवाईची माहिती दिली आहे. आयएसआयला आर्थिक मदत करणाऱ्या रेहान सिद्दीकीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या बड्या बॉलिवूड कलाकारांची ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या मार्फ़त चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी आता लावून धरली आहे.

ह्युस्टन, अमेरिका येथून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कागदपत्रांच्या आधारे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सुमारे ३ वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तक्रार दाखल केली. अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती या तक्रारीतून देण्यात आली होती. तसेच सिद्दीकीच्या रेडिओ चॅनल, सोशल मीडिया या मार्फ़त होणारा भारतविरोधी प्रचार याचीही माहिती देण्यात आली.

रेहान सिद्दीकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्यावर बंदी घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांची भेट घेतल्यावर ह्युस्टन येथील हायकमिशनला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, फेब्रुवारी २०२० मध्ये खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना या प्रकरणी पत्र लिहून कारवाईची मागणी केली. या पत्राची दखल घेऊन, केंद्र सरकारने, ह्युस्टन येथील काँस्युलेट जनरल ऑफ इंडिया यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर, रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांचा भारत विरोधी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भातील अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालायला सोपविण्यात आला. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले.

तसेच, वॉशिंग्टन मधील भारतीय दुतावासाने भारतीय कलाकारांना, रेहान सिद्दीकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमांमध्ये सामील न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयीची माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी पत्राद्वारे खासदार राहुल शेवाळे यांना २८ जून २०२० रोजी कळविली असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a comment

0.0/5