Skip to content Skip to footer

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट

अनेक ठिकाणी दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पश्चिम हिमालयातून वाहणारे कोरडे आणि थंड वाऱ्यांनी उत्तर भारतातील तापमानात घट होऊन थंडीची लाट पसरली आहे.  जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजधानी दिल्ली आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्येही तापमान घसरले असून अजून काही दिवस ही लाट कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. अनेक ठिकाणी दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

काश्मीरमध्ये उणे तापमान

काश्मीरमध्ये होणाऱ्या वर्फवृष्टीमुळे शीतलहर पसरली असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट होऊन ते गोठणबिंदूच्याही खाली गेले आहे. काश्मीर खोऱ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद पहलगाम या पर्यटनस्थळी झाली. मंगळवारी रात्री तापमान उणे ११ अंश सेल्सिअस होते, तर उन्हाळी राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीनगर येथे तापमान उणे २.२ इतके नोंदले गेले. तर काझीगुंड येथे उणे २.५, कुपवाडा उणे २.८ आणि कोकोरनग येथे उणे ६.५ अंश सेल्सिअस तापमान होते. जम्मू-काश्मीरमध्ये कडक थंडीचा चिलाई कलान हा ४० दिवसांचा कालखंड सुरू असून २१ डिसेंबरपासून सुरू झालेला हा कालखंड ३१ जानेवारीला संपेल. थंडीच्या लाटा येत असून तापमान कमी झाल्याने अनेक ठिकाणी नद्या व तलाव गोठण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागांत नळाचे पाणीही गोठल्याने अडचणी येत आहेत.

राजस्थानातील गारठा कायम

गेल्या काही दिवसांपासून पसरलेली तीव्र थंडीची लाट राजस्थानात कायम असून बुधवारी दोन ठिकाणचे तापमान गोठणबिंदूच्याही खाली गेले. माऊंट अबू येथे उणे ४ अंश सेल्सिअस, तर चुरू येथे उणे १.५ तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पिलानी येथे ०.५ अंश, भिलवाडा, चित्तोडगढ, गंगानगर, कोटा, जेसलमेर आणि जयपूर येथे तापमान ६ अंशाखाली नोंदले गेले.

दिल्लीत धुक्याची चादर 

दिल्लीचे तापमान बुधवारी ३.५ अंश सेल्सिअस इतके उतरले असून या आठवडय़ात तेथे शीतलहरीचा सामना करावा लागणार आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरून तीव्र शीतलहर पसरू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. राजधानीत रात्रीच्या वेळी दाट धुके पसरत असून पालम भागात दृश्यमानता ५० मीटर इतकी होती. तर सफदरजंग भागात ती ५०० मीटर आहे.

राज्यात हलका गारवा

पुणे: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीच्या लाटेची स्थिती असल्याने राज्यात हलका गारवा आहे. प्रामुख्याने कोकण विभागातील किमान तापमान सरासरीखाली असून, इतर विभागांत बहुतांश भागांत ते सरासरीच्या आसपास आहे. ३१ डिसेंबरला कोकण विभागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे वगळता इतर ठिकाणी तापमान सरासरीच्या जवळपास आहे. त्यामुळे या भागांत रात्री हलका गारवा आहे. पुण्यात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी वाढला आहे. नाशिकमध्ये मात्र बुधवारी राज्यातील नीचांकी ११.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  कोकण विभागात मुंबईच्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत १.४ अंशांनी खाली आला आहे.

Leave a comment

0.0/5