Skip to content Skip to footer

गोवा विधानसभेत शिवसेना स्वबळावर लढवणार २५ जागा: संजय राऊत

महाराष्ट्र बुलेटिन : गोवा विधानसभेच्या निवडणूका पुढच्या वर्षी मार्च महिन्यात होणार आहेत. गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागांवर उमेदवार आपले भवितव्य आजमावतील. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, गोव्यात शिवसेना जवळपास २० ते २५ जागा लढवणार आहे. यामुळे शिवसेना गोव्यात भाजपाची कोंडी करणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेने नुकतेच पश्चिम बंगालमध्ये आपले उमेदवार उतरवण्याचे स्पष्ट केले होते, मात्र उमेदवार रिंगणात न उतरवता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मात्र आता गोवा विधानसभेकडे शिवसेनेने मोर्चा वळवला आहे, त्यामुळे भाजपाला जास्त कसरत करावी लागणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी आपली रणनीती आखण्याला सुरुवात केली आहे. संजय राऊत हे सध्या गोवा दौऱ्यावर असून ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. दरम्यान पणजी येथील शिवसेनेच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी गोव्याच्या राजकीय परिस्थितीवर परखडपणे त्यांचे मत मांडले असून शिवसेना स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊतांनी सांगितले की, ‘मगो आणि गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून शिवसेनेने गेल्या वेळी निकडणूका लढवल्या होत्या. युतीमध्ये केवळ ३ जागा आमच्या वाटेला आल्या होत्या, कारण युती म्हटलं की मर्यादा येत असतात आणि पक्ष विस्तारावर देखील मर्यादा येतात. त्यामुळे यावेळी आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, जवळपास २५ जागांवर आमचे उमेदवार असतील, त्यापैकी १० ते १५ ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले असून उर्वरित ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अद्याप बाकी आहे.’

Leave a comment

0.0/5