Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश आंबटच!

पुणे , ता. 5 ( विशेष प्रतिनिधी) गेल्या तीन लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही शिरूर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळात घोळ सुरूच आहे. छोट्या पडद्यावरील नट, शिवसेनेचा पूर्वाश्रमीचा उपनेता डॉ .अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून शिरूर मध्ये निवडणुकीसाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचे काम पक्षाचे एक-दोन नेते करत आहेत .प्रत्यक्षात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासाठी अमोल कोल्हे यांचा प्रवेश आंबटच आहे. कोल्हे उमेदवार नाहीत तर ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत अशी ‘कोल्हेकुही’ करून या नेत्यांनी त्यांना फ्लॉपस्टार ठरवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे

शिरूर मधील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना तोडीस-तोड उमेदवार देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे यावेळीही फसले आहेत . उमेदवार ठरवता- ठरवता आचारसंहिता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. छोट्या पडद्यावरील नट अमोल कोल्हे यांना पक्षात आणले. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे लोकसभेला इच्छुक असणारे भोसरी चे माजी आमदार विलास लांडे. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पैलवान मंगलदास बांदल. तसेच निष्ठावान कार्यकर्ते चंदन सोंडेकर यांच्यासह अनेकांना इच्छेला मुरड घालण्याची वेळ आली. त्यांनी कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

लांडे म्हणतात, कोल्हे स्टार प्रचारकच !

माजी आमदार विलास लांडे यांनी कोल्हे उमेदवार नाहीत, तर पक्षाचे स्टार प्रचारक आहेत असे जाहीर केले. तर बांदल यांनी राष्ट्रवादीकडून आपल्या उमेदवारीचा विचार होत नसल्यास वंचित आघाडीतर्फे उमेदवारी का शड्डू ठोकला आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी कॉंग्रेसमध्ये बंडाळी अटळ आहे .शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. सद्यस्थितीत अमोल कोल्हे यांचे खास समर्थन केवळ दिलीप वळसे पाटील यांच्याकडून होत आहे .अन्य नेत्यांनी नरो वा कुंजोवा भूमिका घेतली. त्यामुळे कोल्हे केवळ वळसे पाटील यांचे उमेदवार असल्याचे चित्र पक्षात आहे.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता या मतदारसंघातील माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, सावध पाऊल टाकताना दिसतात. जुन्नर असे माजी आमदार वल्लभ बेनके हे प्रकृतीस्वास्थ्य अभावी सक्रिय नाहीत ,मात्र त्यांचे चिरंजीव अतुल बेनके हे देखील सावध झाले आहेत. कोल्हे लोकसभेचे उमेदवार नसले तरी ते सहा महिन्यानंतर जुन्नर विधानसभेचे उमेदवार होऊ शकतात. याची धास्ती आहे. दिलीप वळसे पाटील हे लोकसभेचे उमेदवार असावेत तशी इच्छा पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची आहे परंतु ते लोकसभेचे धाडस करत नाहीत .प्रत्येक निवडणुकीत वळसे-पाटील असा कुणीतरी उमेदवार शोधून त्याला खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात उभा करतात . आणि त्याचा राजकीय बळी देतात. हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. कोल्हे यांचा प्रवेश यापेक्षा वेगळा नाही .असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये गेला आहे. खासदार आढळराव पाटील यांचे काम आणि लोकप्रियता तसेच अफाट जनसंपर्क बघता अमोल कोल्हे यांना देखील याची जाणीव असल्याने, त्यांचा कॉन्फिडन्स खचू नये यासाठी पक्ष प्रवेशाच्या वेळी कोल्हे यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून, शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील बोलबच्चन नेत्यांना मुंबई बोलून कोल्हे यांचा ब्रेन वॉश करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्याचा नेमका इम्पॅक्ट कोल्हे यांच्यावर किती झाला. याचा अंदाज घेण्यासाठी शिरूर मध्ये तीन -चार दिवसांचा दौरा सुरू केला आहे. राजकीय जाणकारांच्या मते कोल्हे निवडणूक लढविण्या ऐवजी स्टार प्रचारक म्हणून काम करतील ,नंतर काय ते ठरवतील. शिरूर मध्ये आढळराव पाटील यांच्या विरोधात दस्तुरखुद्द शरद पवार त्यानंतर आताच्या घडीला अजित पवार यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा करून पुन्हा माघार घेतली . हे बघा कोल्हे आपला निर्णय घेतील असे पक्षातील कार्यकर्त्यांना वाटते .राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत कोल्हे यांच्या माध्यमातून जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न होणार असल्याने त्याचा फटका भविष्यात आपल्याला बसू शकतो, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा निवडणुकीतील इच्छुक अंतर ठेवून आहेत.

लांडे यांनी करायचे काय?
गेली दोन महिने शिरूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेले भोसरी चे माजी आमदार विलास लांडे यांनी सर्व तयारी केली आहे. कोल्हे यांच्या प्रवेशानंतर लांडे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ असून बंडाच्या पवित्र्यात आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोयीप्रमाणे वापर करण्याच्या कृतीविरोधात तीव्र नाराजी असून त्यांचा रोष दिलीप वळसे पाटील यांच्यावर आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यातील मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अशी पदे भूषवणारे आणि शिरूरमधील 5 विधानसभा मतदार संघातील अन्य आमदारांनी नेत्यांना कुजवत ठेवणारे ठेवणारे त्यांचे राजकारण, त्यामुळे खेड शिरूर भोसरी आणि हडपसर मधील स्थानिक नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे .यासंबंधी काही नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे कानावर घातले आहे. अजितदादांनी लोकसभा निवडणुकीनंतर काय ते बघू! अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. या सगळ्या घडामोडी शिरूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. शिवसेनेचे उपनेते असताना कोल्हे यांचे राजकारण अपयशी ठरले. त्यांना मोठी जबाबदारी देऊन देखील यश मिळवता आले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांचा नवा ‘अभिनय’ कसा असेल याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेते घेत आहेत.

Leave a comment

0.0/5