२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची युती झालेली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ठाणे मतदार संघासाठी आनंद परांजपे यांच्या नावाची राष्ट्र्वादीने घोषणा केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कडून शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले आनंद परांजपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ठाण्यातील काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला विरोध दर्शवला आहे तसेच ब्लॉक अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करणार नाही असे लेखी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना कळविले आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असताना राष्ट्र्वादीने काँग्रेस कार्यकर्त्यांना हींन प्रकारची वागणूक दिलेली होती असे आरोप लावण्यात आलेले आहे.
ठाणे शहराचे पालक मंत्री असताना माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपल्याच राष्ट्रवादीच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना एससीओ पद बहाल केले होते. निवडणुकांच्या वेळी आघाडी करायची आणि नंतर अपमान करायचा ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची वृत्ती झाली आहे असा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रामध्ये तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे ठाणे शहरात राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंद परांजपे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक पालकमंत्री असताना ठाणे काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याचे नाव एससीओच्या यादीमध्ये नक्हते याची आठवण पत्रामध्ये करून देण्यात आली आहे.
ठाणे शहर हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. आज शिवसेना वाढवणारे स्वर्गीय आनंद दिघेंची कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणून ठाणे शहराचा उल्लेख होते. आज ठाणे शहराचे पालक मंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या तगड्या कामगिरीने ठाणे आणि कल्याण शहर शिवसेना सहज काबीज करू शकते. ठाणे शहरातील महानगर पालिकेत सुद्धा शिवसेना पक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात असलेल्या वादामुळे सहजच शिवसेना भारी बहुमताने जिंकून येणार असेच बोलले जात आहे.