Skip to content Skip to footer

नगरमध्ये संग्राम जगतापांना धक्का, काँग्रेसचा सुजय विखे ना पाठिंबा

अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केली.

नगर जिल्हा काँग्रेसने जाहीर केलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. शिवाय, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत लढत असताना, नगरमध्ये मात्र जिल्हा काँग्रेसने थेट भाजपला मदत करण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

राज्यात आघाडी आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. नगरमधील घटनेत सत्यता असेल, तर कारवाई करु, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

सुजय विखे च्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य: बाळासाहेब हराळ

सगळ्या तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांनी आमचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले.त्यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी आमचा प्रचार करुन आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. या भूमिकेवर आमच्याशी काँग्रेसने संपर्क साधला नाही. ज्या माणसाने आमची माणसं निवडून येण्यासाठी प्रयत्न केले, त्या माणसाच्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी टीव्ही 9 मराठीकडे व्यक्त केली.

गोवारी आदिवासींचा मारेकरी कोण?

राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची भूमिका

सुजय विखे पाटील यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नगरमध्ये वैयक्तीक भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी यापूर्वी सुजय विखेंचा प्रचार करणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा करुनही सुजय विखेंच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे पाटील आख्खं नगर पालथं घालत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून विखेंना मानणारा काँग्रेसचा गट भाजपच्या सुजय विखेंच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आघाडीला भाजपने खिंडार पाडलं होत. मात्र, हे सर्व वातावरण निवळतंय तोच आणखी एक धक्का आघाडीला बसला आहे. आता काँग्रेसने थेट भाजपचे उमेदवार असलेल्या सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5