Skip to content Skip to footer

राजनाथसिंहा सोबत मी हवाईदौरे सुद्धा केले भाड्यानं विकलेल्या मनसेला हे माहित नाही-तावडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि भाजपा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यात निवडणुकीच्या काळात शाब्दिक चकमक वाढलेली दिसून येत आहे. काही दिवसापुर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडे यांना एकदा तरी आपल्या गाडीत बसू द्यावे अशी विनंती पत्रात करण्यात करण्यात आलेली होती. प्रकरण असे की, राजनाथसिंह यांच्या मुंबई दौऱयाच्या वेळी मंत्री राजनाथसिंह यांच्या सुरक्षारक्षकांनी तावडे यांना त्यांच्या गाडीत बसण्यासाठी मज्जाव केला होता आणि हा विडिओ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होता याच व्हिडिओचा आधार घेत मनसे कार्यकर्त्यांनी तावडे यांना चिमटा काढला आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मनसेच्या पत्रावर बोलताना मनसे हा भाड्याने विकलेला पक्ष असल्याचे म्हटलं आहे. तसेच, ‘ती पाच वर्षांपूर्वीची घटना आहे, त्याचा आताच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. त्यानंतर, राजनाथसिंह यांच्यासोबत मी अनेक दौरे केले. गाडीतून केले, विमानातून केले, ट्रेनमधून गेले. पण मनसे, जे भाड्यावर विकले जातात, त्यांना हे माहिती नाही, असे म्हणत तावडेंनी मनसेने राजनाथसिंहांना लिहिलेल्या पत्राचा समाचार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि भाजपाविरुद्ध आपला आवाज उठवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज यांच्यावर टीका करणाऱ्या नेत्यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून समाचार घेण्यात येत आहे. त्यातच, नवी मुंबईतील मनसेच्या अध्यक्षांनी चक्क राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना एकदा तुमच्या गाडीत बसू देण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली होती.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर राजकीय स्ट्राईक केला आहे. तर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इचलकरंजी येथील सभेत बोलताना, तावडेंना विनोदी नेता असे संबोधले होते. तसेच, राजनाथसिंहांचा ड्रायव्हर ज्यांना आपल्या गाडीत बसू देत नाही, त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये, असेही संदीप देशपांडेंनी म्हटले. त्यानंतर, नवी मुंबईतील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मनसेचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Leave a comment

0.0/5