गांधी कुटुंबाने ‘आयएनएस विराट’चा वापर सुट्टी घालवण्यासाठी केल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. देशातील युद्धनौकेचा वापर कुणी सुट्टी घालवण्यासाठी केल्याचे कधी तुम्ही ऐकले आहे का? पण असे घडले आहे. राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा दहा दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी ‘विराट’ युद्धनौकेवर गेले होते. गांधी कुटुंबाने या युद्धनौकेचा टॅक्सीसारखा वापर करून देशाचा अपमान केल्याची टीकाही मोदी यांनी केली.
दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित प्रचारसभेत मोदींनी गांधी कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवला. युद्धनौकेवर त्यावेळी राजीव गांधी यांचे इटलीवरून आलेले सासू-सासरेही होते असेही मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, जेव्हा एखादे कुटुंब मोठे होते तेव्हा देशाच्या सुरक्षेलाच धोका निर्माण होतो, असेही मोदी म्हणाले. २०१४ पूर्वी देशात एकाचवेळी दोन मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सरकारची हिंमत होत नव्हती. २००९ आणि २०१४ मध्ये यूपीए सरकारच्या कार्यकाळात लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचे सामने एकत्र आले नव्हते, पण आम्ही मात्र हे करून दाखवले याकडेही मोदी यांनी यावेळी लक्ष वेधले.