Skip to content Skip to footer

राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट……

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप चर्चांना उधाण आले. परंतु दोघांमधील ही भेट राजकीय नव्हती असे स्पष्टीकरण देत विखे पाटलांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये झालेल्या वादविवादानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यांनी नगरमध्ये सुपुत्र सुजय विखेंविरोधात प्रचारही केला नाही. तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या, परंतु त्यांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अचानक मुंबईमध्ये गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या. परंतु विखे यांनी ही भेट राजकीय नव्हती, असे सांगून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही मागणी महाजनांसमोर ठेवणे हा या भेटीमागील उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

 

दुष्काळावरून राजकारण नको दरम्यान, या भेटीबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले की, सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विविध मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे दुष्काळी दौरे सुरु आहेत. पण दुष्काळावरुन कुणीही राजकारण करु नये, असे आवाहन विखे पाटलांनी केले. शासकीय पातळीवर सध्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी योजना सुरु आहेत, असेही ते म्हणाले. तसेच नगर जिल्ह्यातील पाण्याचा मुद्दा गिरीश महाजनांसमोर मांडल्याचेही त्यांनी म्हटले.

Leave a comment

0.0/5