Skip to content Skip to footer

राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा फेटाळला…….

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, कार्यकारिणीने राहुल गांधींचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यानंतर काँग्रेस पराभवाबाबत खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे, सोनिया गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, प्रियंका गांधी, मीरा कुमार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, गुलाम नबी आझाद हे नेते दिल्ली स्थित कार्यालयात उपस्थित आहेत.

काँग्रेस कार्यकारिणीकडून आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यासाठी राहुल गांधी नसल्यास अध्यक्षपदासाठी कोणते पर्याय असतील, यावर बैठकीत खल सुरू होता. लोकसभा निवडणुकीत वेळोवेळी भाजपकडून सातत्याने काँग्रेसमधील गांधींच्या घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचा मोठा फटका पक्षाला निवडणुकीत बसला होता. त्यामुळे गांधी घराण्याबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याचा विचारही यानिमित्तानं सुरु होता. त्यासाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत, ज्योतिरादित्य शिंदे, मल्लिकार्जून खरगे आणि तरुण गोगोई यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. परंतु, अखेर अपेक्षेप्रमाणेच राहुल गांधींचा राजीनामा फेटाळण्यात आला आणि यापुढेही पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबीयांकडे राहणार, यावर शिक्कामोर्तब झाला.

Leave a comment

0.0/5