Skip to content Skip to footer

बारामतीत पुन्हा पवारांची कोंडी पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांची वर्णी ?

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपाने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शतप्रतिशत कमळ फुलवायचं आहे. यासाठी भाजपाने रणनीती तयार केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या जागेवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देऊन पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देता येणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे आतापासून रणनीती तयार करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे संसदेत गेल्यामुळे आता पुण्याच्या पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पुन्हा पवार कुटुंबीयांची कोंडी करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आखलेल्या रणनीतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चांगलीच दमछाक झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करण्याचे नियोजन भाजपने केलंय. पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांच्या निवडीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एका दगडात अनेक पक्षी मारता येणार आहेत.

Leave a comment

0.0/5