Skip to content Skip to footer

कोल्हापुरात पुन्हा युतीचा भगवा फडकणारच….

लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन्ही जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या शानदार यशामुळे कोल्हापुरात सर्वात प्रबळ पक्ष म्हणून शिवसेना पुढे आलेली आहे. दोन खासदार, सहा आमदार असेलेली शिवसेना आणि राज्य मंत्री मंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान, दोन आमदार अशी मजबूत भाजपाच्या जोडीला छत्रपती संभाजी यांची राज्यसभेची खासदारकी अशा भरभक्कम महायुतीशी सामना करणे हे शक्तिहीन बनलेल्या विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समोर मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसला विधानसभेचे खाते उघडणे आणि राष्ट्रवादीला दोन आमदारांचा आकडा वाढवणे हे सुद्धा कठीण असणार आहे

आजवरचा इतिहास पाहिला तर कोल्हापूर जिल्ह्याने काँग्रेसच्या बाजूने मतांचे दान टाकले. शेकापच्या पराभवा नंतर काँग्रेस हीच मुख्य पसंत राहिली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर घडय़ाळाची टिकटिक मोठय़ा प्रमाणात वाजू लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीत उभय काँग्रेसच्या अस्तित्वाला तडा गेला. काँग्रेसला तर एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. पुढे, विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी विजय मिळवल्याने काँग्रेसकडे मागील दाराने गेलेला का असेना पण एक आमदार राहिल्याने पक्षाची अब्रू राहिली. राष्ट्रवादीच्या एका वेळी मंत्रिपदाच्या तीन लाल दिव्याच्या गाडय़ा जिल्ह्यात फिरत होत्या, याच पक्षाचे हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर हे दोनच आमदार गत वेळी निवडून आले. जिल्हा परिषदेची सत्ता दोन्ही काँग्रेसला गमवावी लागली.

याउलट, महायुतीचा विस्तार वाढतच गेला. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील या आमदारांच्या जोडीला गेल्या वेळी उल्हास पाटील आणि प्रकाश आबिटकर असे आणखी दोन आमदार विजयी झाले. भाजपने सुरेश हाळवणकर यांच्या खेरीज अमल महाडिक ही नवी जागा निवडून आणली. पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल मंत्रिपद आले. याच काळात छत्रपती घराणेही भाजपच्या तंबूत दाखल झाले. तर, समरजितसिंह घाटगे यांना ‘म्हाडा’ पुणेचे अध्यक्षपद मिळाले. महायुतीच्या या ताकदीमध्ये यामध्ये आता संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची भर पडली आहे. बळकट झालेल्या महायुतीचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसण्याची चिन्हे आहेत.

Leave a comment

0.0/5