Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, नापास झाल्यावर पेन कसा जबाबदार…….

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचाही समावेश आहे.

ही यात्रा भुसावळ येथे आली असता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ”एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्यासाठी पेन जबाबदार नसतो. त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, मेहनत आणि आकलन त्यासाठी जबाबदार असते असं म्हणत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवास विरोधक स्वतः जबाबदार असल्याचं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘लोकसभा निवडणुकीच्या आधी हेच विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होते. मात्र, मोदींना शिव्या देऊन काही होणार नाही हे आता त्यांना कळून चुकलंय. जयराम रमेश, अभिषेक मनु सिंघवी यांना जे कळलंय ते राज्यातल्या इतर नेत्यांनाही लवकरच कळेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत स्वबळावर बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. परंतु भाजपच्या या यशाला विरोधकांकडून इव्हीएम घोटाळा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यालाच मुख्यमंत्र्यांनी परीक्षेचे उदाहरण देत उत्तर दिले आहे.

Leave a comment

0.0/5