Skip to content Skip to footer

जेष्ठांना डावलत नव्याने आलेल्या दरेकरांना विरोधीपक्षनेते पदी संधी

जेष्ठांना डावलत नव्याने आलेल्या दरेकरांना विरोधीपक्षनेते पदी संधी

विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपाचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. पण प्रविण दरेकर यांनी भाजपाच्या या दिग्गजांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवले आहे.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरुनही विरोधी बाकावर बसणाऱ्या भाजपासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्वाचे पद आहे. या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर यांचे नाव कालपासून आघाडीवर होते. पण अखेरच्या क्षणी प्रविण दरेकर यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे.

प्रविण दरेकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्द सुरु केली. ते राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. पुढे राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर ते मनसेमध्ये आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते २०१४ पर्यंत ते आमदार होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. दरेकर ह्यांच्याकडे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून पहिले जाते.

Leave a comment

0.0/5