शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसात कोसळेल अशी भविष्यवाणी भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली होती. भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसात पडले असे वक्तव्य राणे यांनी केले होते.
नारायण राणे यांच्या भाकितावर शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. नारायण राणे भविष्यकार आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करत पाटील यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच ते स्वतःचे भविष्य बनवू शकले नाही तर ते दुसऱ्याचं काय सांगणार असे, गुलाबराव पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना बोलत होते. तसेच महाविकास आघाडीचे काम जोरात सुरु झाले असून, ज्यांना भाजपाने बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी सांगू नये, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी राणेंचा खरपूस समाचार घेतला.