शिवसेनेने भाजपा पक्षाची आपली २५ जुनी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली होती. परंतु तीन महिने उलटून गेल्यानंतर देखील भाजपाचे नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिवसेनेला अधून मधून पुन्हा युतीचा प्रस्ताव देत असतात. मुस्लिम आरक्षणाचा दबाव घेऊन नका, प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत असू, असे म्हणत आज त्यांनी सेनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार हे वारंवार स्वप्नरंजनात रंगत असतात. ते आणखीही वास्तव परिस्थिती समजून घेत नाहीयेत. लवकरच आम्ही ‘मुनगंटीवार के सपने’ हे पुस्तक आम्ही प्रसिद्ध करू, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी लगावला. “कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल काय? याची मुनगंटीवार वाटच बघत आहेत. अशी स्वप्नरंजनं मुनगंटीवार करतायेत. म्हणून पाच वर्ष सरल्यानंतर जसं ‘मुंगेरीलाल के सपने’ हे पुस्तक आहे तसं आम्ही ‘मुनगंटीवार के सपने’, असं पुस्तक प्रसिद्ध करू.”, असं ते म्हणाले.