Skip to content Skip to footer

नागपुरात संघाचं मुख्यालय आहे, तर तिथे कोरोनाचा कहर कसा ? ; राजू शेट्टींचा सवाल.

नागपुरात संघाचं मुख्यालय आहे, तर तिथे कोरोनाचा कहर कसा ? ; राजू शेट्टींचा सवाल.

धारावीत करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर आता श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे करोना नियंत्रणात आल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावरून “जर संघाने धारावी करोनामुक्त केली, असा दावा केला जात असेल, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात करोनाचा कहर कसा झाला?,” असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात बोलताना धारावीतील करोना नियंत्रणावर भाष्य केलं. शेट्टी म्हणाले, “धारावीमध्ये ज्यावेळी परिस्थिती भयावह झाली होती. माणसं मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत. जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशी एकही बातमी पाहण्यात आली नाही. पण, जागतिक आरोग्य संघटनेनं जेव्हा सांगितलं की, धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली. त्यावेळी अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले.”

“माझ्या मनात एक छोटी शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही करोनाचा हाहाकार झाला आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही. कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इंचलकरंजीत करोनाचा हाहाकार आहे. अनेक शहरात आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावं. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र करोना मुक्त करण्याचं काम करावं. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल,” असं शेट्टी म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

“ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याच कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी करोनाचा केंद्र बिंदू ठरली. पण धारावीनं करोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे. करोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

Leave a comment

0.0/5