Skip to content Skip to footer

… हा तर मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास : सुप्रिया सुळे

विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालं यश

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानले. दरम्यान, हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

 

आणखी वाचा- भाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

 

नागपूरमध्येही भाजपाला धक्का

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

औरंगाबादमधूनन सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल ११६६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

Leave a comment

0.0/5