Skip to content Skip to footer

ते मास्टर्स स्ट्रेटजिस्ट आहेत; संजय राऊत यांचा भाजपाला टोला

मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपावर शरसंधान साधलं आहे. अँजिओप्लास्टीनंतर राऊत यांना लिलावती रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर राऊत यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. यावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करतानाच राऊत यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, असा दावा केला.

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार म्हणाले आहेत पाच वर्षांचा विचार कशाला पुढील २५ वर्षासाठी भूमिका ठेवली पाहिजे, मला हे योग्य वाटतं. पदवीधर मतदारसंघ, शिक्षण मतदारसंघातील मतदार विचार करून मत देणारा आहे. त्यांनी मतदानाचा कल दाखवला, तो महाराष्ट्राची दिशा दाखवणारा कल आहे. जे काल परवा सांगत होते की, या सरकारला जनमताचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा हा कशा पद्धतीने आहे, हे काल दिसलं. नागपूरसारख्या मतदारसंघात ४०-४५ वर्षांपासून भाजपाचा उमेदवार आहे. दुसरं कुणी लढण्याचा विचार करू नये, अशी तटबंदी आहे. अशा ठिकाणी काँग्रेसचे वंजारी जिंकून येतात. हे कसलं लक्षण समजायचं,” असं राऊत म्हणालेत.

“पुण्यात पदवीधरची जागा भाजपाकडे होती. त्यांचे सगळे बालेकिल्ले कोसळले. अमरावतीमध्ये श्रीकांत देशपांडे शिवसेनेचे उमेदवार होते. तिथे चौरंगी लढत झाली. इतरही काही फॅक्टर होते. आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक लढलो. एखाद दुसरी निवडणूक आम्ही हरलो. आमच्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून बघतो. आत्मचिंतन करू. आत्मचिंतन करणं हा दोष नाही. आत्मचिंतनाची वेळ ज्यांनी बालेकिल्ले गमावले त्यांनी करावं. आम्ही कृतीवाले आहोत. या पराभवातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. नागपूरमधील भाजपाचा पराभव म्हणजे शिवसेनेनं लालबाग परळ गमावण्यासारखं आहे. हे आमचे बालेकिल्ले आहेत. कोणत्याही स्थितीत जिंकायला हवेत. हा पराभव देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं मी म्हणणार नाही. विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे झालं असतं, तर निकाल वेगळे लागले असते.

“मुंबई महापालिक निवडणूक असो की महाराष्ट्रातील निवडणूक, आम्ही एकत्र राहू. एकत्र राहण्याचे फायदे काल आलेल्या निवडणुकांनी दाखवून दिले आहेत. भाजपाच्या रणनितीविषयी मी कसं बोलणार. ते मास्टर्स स्ट्रेटजिस्ट आहेत. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. आम्ही चर्चा करतो, निर्णय घेतो. कार्यकर्ते काम करतात. त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे,” असं राऊत म्हणाले.

Leave a comment

0.0/5