Skip to content Skip to footer

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा धनंजय मुंडेंना डच्चू; राजेश टोपेंकडे नवी जबाबदारी

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीची ताकद आणि संघटन वाढवून येणाऱ्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी करण्यासाठी औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून राजेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी होती. आगामी महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्वाचा समजला जातोय. संपर्कमंत्री म्हणून टोपे यांनी महिन्यातून किमान एक बैठक घेऊन त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवावा, असे देखील नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्यानंतर लगेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लाॅकडाऊनमध्ये बरेच महिने निघून गेले. त्यामुळे त्यांना संपर्कमंत्री म्हणून शहरासाठी वेळच देता आला नाही.

राष्ट्रवादी काॅग्रेसच्या मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून राजेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता कोरोना काळात राज्यातील जनतेचे रक्षण केल्यानंतर टोपे आगामी निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीला किती बळकट करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a comment

0.0/5