सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत झाला. २०१७पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला पीएमआरडीए, पालिका प्रशासन यांच्याकडून विकास आराखडा आखणे, त्यावर हरकती सूचना मागविणे अशा महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींतून जावे लागते. ती पक्रिया आता कुठे अंतिम टप्यात आली आहे. या सर्व गावांच्या विकासासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे तब्बल ९ ते १० हजार कोटींची मागणीही केली असून गेली पाच वर्ष ही प्रक्रिया अथकपणे सुरूच असल्याचेही निदर्षणास आणून दिले. त्यामुळे समाविष्ट गावाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा गैरवाजवी असल्याचे त्यांनी सांगितले.
वाघोली परिसराचा विचार करता केवळ वाढीव मिळकत कर घेतला जातो आणि कामे होत नाहीत या विधानावरही त्यांनी, सध्या महापालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने काही मर्यादा पडल्याचे मान्य केले, मात्र शासकीय यंत्रणांची कार्यपद्धती, अमंलबजावणी, नियम अशा तांत्रिक बाजूही लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सांगून, प्रशासकीय पातळीवरील प्रकियेची माहिती नसताना केवळ अहमिकेतून कोणी वेगळी भूमिका मांडत असेल तर ती वाघोलीच्या नागरीहिताच्या दृष्टीने घातक असल्याचेही ते म्हणाले.
प्रशासकीय पातळीवरील प्रकियेची माहिती नसताना केवळ अहमिकेतून कोणी वेगळी भूमिका मांडत असेल तर ती वाघोलीच्या नागरीहिताच्या दृष्टीने घातक आहे.
– ज्ञानेश्वर आबा कटके
सध्या वाघोलीच्या नागरीकरणाची गती पाहता, त्याला आवश्यक असणाऱ्या मोठ्या प्रमाणाल्या मूलभूत गोष्टींचीची पूर्तता महापालिकेतूनच होऊ शकते. वीज, पाणी, रस्ते, कचरा, ड्रेनेज यांसह अन्य विकासकामांसाठी भरीव निधींची तरतूद महापालिकेद्वारेच शक्य आहे. राज्य शासनाकडून छोट्या नगरपरिषदांना मिळणारा मर्यादित निधी पाहता वाघोलीच्या नागरीविकासाची गती त्यातून राखली जाऊच शकत नाही हे ठामपणे सांगून, त्याचमुळे वाघोली गाव महापालिकेत असणेच गरजेचे असल्याचेही श्री. कटके यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक मुद्दा नेमकेपणाने सांगताना, त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख म्हणून जिल्ह्यात फिरत असतानाचे ग्रामीण भागातल्या विकासाबाबची झालेली बकाल अवस्थाही श्री. कटके यांनी विषद केली. १९९५ मध्ये जी गावे महापालिकेला विरोध करून बाहेर राहिली त्यांची आज विकासाच्या दृष्टीने परिस्थिती काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला.त्या गावांची तुलना विमाननगर, खराडी, कल्याणी नगर, वडगाव शेरी या तेव्हा महापालिकेत गेलेल्या परिसराचा झालेल्या आजच्या विकासाशी करून महापालिकेच्या मदतीनंच झालेला विकासाच सगळं चित्र ठळकपणे स्पष्ट करतो हेही त्यांनी शेवटी सांगितले.
जाता जाता वाघोलीत येत्या काळात मेट्रो, भामा आसखेडचा पाणी प्रकल्प, याचबरोबर वाहतूकीच्या समस्येचीही सोडणूक होणार असून, केवळ निवडणूक लांबल्याने काही कामे थांबल्याचे त्यांनी सांगितले. तरी देखील त्यांचा आराखडा तयार आहे, म्हणून त्यामुळे वाघोलीचा संतुलित व सर्वांगीण विकास हवा असल्यास वाघोलीला महापालिकेचाच पर्याय योग्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.