Skip to content Skip to footer

देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी लक्षात आहे हे कौतुकास्पद-संजय राऊत

संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे आणणार अशी घोषणा काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार असताना फडणवीस यांनी केली होती. आज कृषी कायद्यांचं महत्त्व सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून बैलगाडी मोर्चा काढला आणि त्यानंतर त्यांनी हे कायदे शेतकरी हिताचे कसे आहेत हे देखील आपल्या भाषणात सांगितलं. यावर संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बैलांचंही पोषण करण्याची ताकद उरलेली नाही.” असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.

एवढंच नाही तर राज्य सरकारकडे पैसे आहेत. ९० कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यांवर कसे खर्च केले जातात? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. तसंच महाविकास आघाडी सरकार हे ढोंगी आहे असाही आरोप त्यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की,  “विरोधी पक्षनेत्यांना अशी भूमिका घ्यावी लागते. ते महाविकास आघाडीवर जेवढी टीका करतील तेवढी महाविकास आघाडी मजबूत होत जाईल” असंही उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जे भाषण केलं त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या. या घोषणांचं स्वागतच आहे असंही संजय राऊत म्हणाले. असं असलं तरीही फक्त मोदींच्या काळातच शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला असं म्हणता येणार नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यापासून ते अगदी अटल बिहारी वाजयपेयी तसंच मनमोहन सिंग यांचं सरकार देशात असताना त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. आपल्या देशाला कृषीप्रधान अशी ओळख मिळाली आहे कारण सुरुवातीपासूनच आपला देश शेतकऱ्यांना महत्त्व देत आला आहे. भाजपाकडून मात्र कडाक्याच्या थंडीत मागचे तीस दिवस आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं आहे ही बाब योग्य नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5