Skip to content Skip to footer

ED च्या मुंबईमधील कार्यालयावर शिवसैनिकांनी लावला ‘भाजपा प्रदेश कार्यालया’चा बॅनर

वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या समन्सवरुन शिवसेना-भाजपा आमने सामने

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने रविवारी यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.

शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला.

काय आहे प्रकरण

मंगळवार २९ डिसेंबर रोजी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

मी जर ठरवलं तर…

संजय राऊत यांनाही पत्रकार परिषदेमधून ईडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपावर टीका केली आहे. बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असं म्हणत राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून भाजपावर घणाघाती टीका केलीय. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल.

राऊत म्हणतात, “भाजपाची काही माकडं…” 

भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाची माकडं कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असंही सांगितलं जातं आहे. धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

अशा लोकांना नोटीस पाठवल्या जातात…

गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5