Skip to content Skip to footer

सनातन ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा

मुंबईअनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ८ जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. या अगोदरही बॉम्बस्फोट आणि विचारवंतांच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक आहे. तो हिंदू गोवंश रक्षा समितीच्या मार्फत काम करतो. त्याने सनातनशी संबंधित सभांमध्ये भाग घेतलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा संबंधही सनातन संस्थेशीच आहे. सनातनचे पदाधिकारी मंत्रालय आणि विधिमंडळात मुक्त संचार करीत आहेत, त्याबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. काही घातपात घडवण्याआधी सनातन संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘सखोल चौकशी करा’

एखादा अल्पसंख्याक व्यक्ती जर बॉम्बसहित सापडला तर त्याची कसलीही शहानिशा न करता, तपास न करता त्याचा पाकिस्तानशी किंवा एलटीटीईशी संबंध जोडला जातो. आज सनातनच्या एका साधकाकडे अशा पद्धतीचे बॉम्ब सापडले आहेत त्यामुळे सरकारने याच्या खोलात जाऊन या बॉम्बचा वापर कुठे करणार होते याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

सनातनवर बंदी घाला -विखे

येत्या बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा हिंसाचार आणि धार्मिक दंगली घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट असल्याचे नालासोपारात सापडलेल्या स्फोटकांमुळे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

सनातनच्या दहशतवादी कारवाया -मलिक

राज्य पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाने नालासोपारा येथून सनातनचा साधक वैभव राऊतला अटक केली असून त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. यावरून सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे हे स्पष्ट होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

Leave a comment

0.0/5