ठाकरे दिलेला शब्द पाळतात, ही ठाकरे घराण्याची परंपराच आहे ! – सुभाष देसाई
“महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शब्दांचे सच्चे आहेत. दिलेला शब्द पाळणे ही ठाकरे घराण्याची परंपराच आहे. त्यामुळे संभाजीनगर शहराच्या विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाळतीलच”, असे वक्तव्य उद्योग मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलून दाखविले.
महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात नाविन्यपूर्ण प्रकल्प होत आहेत. कचरा मुक्त आणि चांगल्या रस्त्यांनी युक्त असे शहर आपल्याला बनवायचे आहेत. यात संभाजीनगरकरांचा मोठा सहभाग आहे. पुढे ‘संभाजीनगर’ असा शहराचा उल्लेख करताना यातून नामांतराबाबत सूचक इशाराही देसाई यांनी दिला.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी संभाजीनगरातील पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले. पडेगाव येथील लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांनी कांचनवाडी येथील नियोजित कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करणाऱ्या प्लांटचे उद्घाटन केले. याठिकाणी शहरातील हॉटेल्स व भाजीमंडईमधून निघणाऱ्या सुमारे ४० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती करण्यात येणार आहे.